वीजबिलाचा मोठा खर्च वाचणार; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण
अक्कलकोट : लाखो भाविकांचे तसेच सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा, हैद्रा देवस्थानासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून,हा संपूर्ण खर्च अन्नछत्र मंडळाकडून सामाजिक बांधिलकीतून करण्यात येत आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सध्या सुरू असून ते येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती हैद्रा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष रफिक मुजावर यांनी दिली.
दरमहा ६० ते ७० हजार रुपयांच्या वीजबिलातून मोठी बचत
हैद्रा देवस्थान येथे दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याने देवस्थान व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत होता. आता २० किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीजखर्चात मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाचणारा निधी देवस्थानच्या धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगात आणता येणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी देवस्थान व्यवस्थापनाच्या विनंतीची तत्काळ दखल घेत सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली.
जावेद पटेल यांच्या पुढाकारातून उपक्रमाला गती
या सौरऊर्जा प्रकल्पासाठी नागनहळळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांनी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांची भेट घेऊन देवस्थानचा वाढता वीजखर्च त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत अन्नछत्र मंडळाने प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.
या कामासाठी उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर आणि सचिव वकील मुजावर यांनीही परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाबद्दल देवस्थानच्या वतीने अन्नछत्र मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून तालुक्यातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सातत्याने मदतीचा हात दिला जातो. दुष्काळग्रस्त, गरजू नागरिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी मंडळाने यापूर्वीही मदत केली आहे.
हैद्रा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, येथे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात नवस फेडला जातो. तालुक्यातील विविध निवडणुकांच्या शुभारंभासाठी नारळ फोडण्याची परंपराही या देवस्थानातून सुरू असल्याचे सांगितले जाते.
हैद्रा दर्ग्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाची ही भेट केवळ वीजखर्च कमी करणारी नसून, सर्वधर्मीय सामाजिक सलोखा, सेवाभाव आणि परस्पर सहकार्याचा आदर्श निर्माण करणारी ठरत आहे.
