सोलापूर : श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,क्रांती चौक,कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर,कुंभारी, सोलापूर यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात येणाऱ्या भव्य ‘श्री हिंगलाज माता मंदिर देखाव्याचे’ जाहीर प्रसिद्धीकरण आज श्री हिंगुलांबिका देवी मंदिर, साखर पेठ,सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत देखाव्याची माहिती देणाऱ्या पत्रिकांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे असलेल्या प्रसिद्ध श्री हिंगलाज माता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्यामुळे हा देखावा गणेशभक्तांसह शहरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
श्री हिंगलाज माता मंदिराला ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या मंदिराची प्रतिकृती साकारून त्यामागील इतिहास,धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून भाविकांना श्री हिंगलाज माता मंदिराची माहिती आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक परंपरांचा परिचय करून घेता येणार आहे.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांनी तसेच गणेशभक्तांनी गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘श्री हिंगलाज माता मंदिर देखावा’ आवर्जून पाहावा, असे आवाहन केले.
या जाहीर प्रसिद्धीकरण कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजक : श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर, कुंभारी,सोलापूर.
