Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी!


घरफोडी, जबरी चोरी व दुचाकी चोरीचे ५ गुन्हे उघड; ₹16.09 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 किलो गांजाही हस्तगत

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासह अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याच्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने घरफोडीचे 2, जबरी चोरीचे 2 आणि मोटारसायकल चोरीचा 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणून ₹16,09,100 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये 2 किलो 11 ग्रॅम गांजा आणि स्कूटी असा ₹1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.निलेश पाटील-सोनवणे,स.पो.नि.शैलेश खेडकर, स.पो.नि.शंकर धायगुडे तसेच पो.उप.नि.विजय बनसुडे यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

घरफोडी व दुचाकी चोरीचे 3 गुन्हे उघड - 10 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे (वय 22,रा.पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण तपासात त्याच्याकडून जेलरोड पोलीस ठाण्यातील 2 घरफोडीचे गुन्हे तसेच सासवड पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण येथील मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा उघडकीस आला.

या कारवाईत 81 ग्रॅम सोन्याचे दागिने,10 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1 युनिकॉर्न मोटारसायकल,असा एकूण ₹12,89,100 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.





CCTVच्या मदतीने जबरी चोरीचा छडा -
1 सप्टेंबर रोजी अशोक चौक परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून जबरी चोरी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 168 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली.

तपासातून संघर्ष उत्तम वाघमारे (वय 22,रा.काठोडा,जि. बीड) याला 9 सप्टेंबर रोजी परभणी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार रोहन तुकाराम थोरात याच्यासह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात 25 ग्रॅम सोन्याची चैन व 5 ग्रॅम सोन्याचे गणपती पेंडल, तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण ₹2,75,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.



2 किलोहून अधिक गांजा जप्त - 10 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पो.उप.नि. विजय बनसुडे व त्यांचे पथक गस्तीवर असताना जुनी मिल चाळ, ओंकार टी हाऊसजवळ दोन संशयित दुचाकीवरून जाताना आढळले. पोलिसांनी पाठलाग करून शिवाजी धनु राठोड (वय 60, रा.गणपत तांडा,बक्षी हिप्परगा, सोलापूर) याला पकडले,तर त्याचा साथीदार संतोष राम चव्हाण पळून गेला.

राठोड याच्याकडील काळ्या रंगाच्या MH-13-FE-1473 क्रमांकाच्या अ‍ॅक्सेस स्कूटीजवळील कापडी पिशवीत गांजा आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीनंतर 2 किलो 11 ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. गांजा व स्कूटी असा ₹1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात NDPS Act कलम 8(क), 20(ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



जुन्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचाही छडा - 16 जानेवारी 2025 रोजी किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करून त्यातील सोन्याच्या दोन वाट्या चोरी करण्यात आल्या होत्या. CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अजय संजय पंडीत (वय 21, श्रीरामपूर) आणि राहुल माणिक आमराव (वय 30, श्रीरामपूर) यांचा माग काढून 10 सप्टेंबर रोजी त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत मंगळसूत्रातील सोन्याच्या दोन वाट्या, ₹45,000 किमतीच्या,हस्तगत करण्यात आल्या.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने घरफोडीचे 2, जबरी चोरीचे 2 आणि मोटारसायकल चोरीचा 1 असे 5 गुन्हे उघडकीस आणून ₹16,09,100 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गांजाविरोधी कारवाईत 2 किलो 11 ग्रॅम गांजा व स्कूटी असा ₹1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम.राज कुमार,पोलीस उपआयुक्त डॉ.अश्विनी पाटील,सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.