सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंदे, नियमबाह्य डान्सबार तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने मुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून २६ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे तसेच पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भोंगाव,ता.उत्तर सोलापूर येथील ‘मुखसागर ऑर्केस्ट्रा बार’ येथे छापा टाकला.
या कारवाईदरम्यान बारमध्ये महिला अंगावर तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर नृत्य करत असल्याचे तसेच ग्राहकांकडून महिलांवर नोटा उधळल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित १५ महिलांची व ग्राहकांची चौकशी करून नावे-पत्ते निष्पन्न केले. घटनास्थळावरून रोख रक्कम,मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा एकूण २८ लाख २५ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित चालक, मालक, व्यवस्थापक तसेच अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, २९९(३)(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ तसेच महाराष्ट्र हॉटेल,उपहारगृहे आणि मधपान कक्ष, बाररूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतच्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक स्वेता चव्हाण,स्वप्नील विश्वजित भोसले,तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनीही कारवाईस सहकार्य केले.
अवैध धंद्यांना थारा नाही : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे अवैध धंदे, नियमबाह्य डान्सबार, अश्लील नृत्याचे कार्यक्रम अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर तसेच त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.
