Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा; सोलापूर न्यायालयाचा दणका!

अजीज शेख यास जन्मठेप; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय

सोलापूर : अल्पवयीन मुलीला फूस लावून घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अजीज अहमद गुलाम दस्तगीर शेख यास सोलापूर येथील न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याची कडक शिक्षा भोगावी लागेल,असा स्पष्ट संदेश गेला आहे.
पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहराच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २५ जुलै २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरी आजीसमवेत असताना आरोपी तिला थोड्यावेळासाठी घेऊन जातो असे सांगून तिच्या आजीची इच्छा नसतानाही तिला घराबाहेर घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेला घराबाहेर आणून सोडले. पीडितेने घडलेला प्रकार आजीला सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी Session Case No. 375/2022 आणि Criminal Case No. 398/2022 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376(2)(i)/(l), 363, 354, 354(A), 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गंभीर प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने प्रभावीपणे केला. सरकारी पक्षाने न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद व आवश्यक पुरावे सादर केल्याने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाले.

न्यायालयाकडून कठोर शिक्षा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली—
भादंवि कलम 376(2)(5) — आजन्म कारावास व ₹10,000 दंड
भादंवि कलम 354 — ३ वर्षे कारावास व ₹2,000 दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास
भादंवि कलम 506 — २ वर्षे कारावास व ₹1,000 दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास.



या खटल्यात सरकारी पक्षातर्फे डोके मॅडम यांनी प्रभावी बाजू मांडली. तपास अधिकारी सपोनि वैजनाथ कुऱ्हे यांनी आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. तसेच पोलीस नाईक प्रवीण जाधव यांनी पैरवीचे काम पाहिले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावून न्यायालयाने समाजाला कठोर संदेश दिला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाने प्रभावीपणे पुरावे सादर केल्यास आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.