‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026’साठी सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी व प्रा.गायत्री बिराजदार यांची निवड
सोलापूर : शिक्षण,समाजसेवा,धार्मिक,सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी ‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 23 सप्टेंबर 2026 दरम्यान PEGASUS REEF, COLOMBO, SRI LANKA येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्य डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी सोलापूरचे श्री.ष.ब्र.108 सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी आणि प्रा.गायत्री गौरीशंकर बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यासोबत व्यापक समाजसेवेचा वसा - श्री.ष.ब्र. 108 सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रमुख कार्य धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात असले,तरी ‘समाजाचे आपण सेवक आहोत’ या भावनेतून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
व्यसनाधीनता, अंधश्रद्धा,पाखंडपणा तसेच सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती करण्याबरोबरच मठाच्या माध्यमातून गुरुकुल चालवून संस्कारक्षम व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप,गरजू व्यक्तींना अन्न-वस्त्रदान तसेच गरीब कुटुंबातील विवाहांसाठी आर्थिक सहाय्य अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
१२ वर्षे विनामोबदला शिक्षणसेवा - प्रा.गायत्री गौरीशंकर बिराजदार गेल्या १६ हून अधिक वर्षांपासून ग्रामीण,दुर्गम तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी तब्बल १२ वर्षे कोणतेही वेतन अथवा मानधन न स्वीकारता विनामूल्य शिक्षणसेवा बजावल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थी सक्षमीकरण,व्यक्तिमत्त्व विकास,महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती आणि समाजविकास या क्षेत्रांतही त्यांनी योगदान दिले आहे. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या भाषिक व सामाजिक अडचणी लक्षात घेऊन त्यांना शिक्षणाची संधी,आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दुबई येथे United States American University of Peace यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सन्मान,तसेच कर्नाटक किरीट पुरस्कार आणि बसवरत्न पुरस्कार (सोलापूर जिल्हा) यांसह विविध सन्मान प्राप्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बालाजी सरोवर येथे पत्रकार परिषद संपन्न - ‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026’च्या निमित्ताने बालाजी सरोवर, सोलापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुरस्कार प्राप्त श्री.ष.ब्र.108 सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी,प्रा.गायत्री गौरीशंकर बिराजदार, उद्योगपती निसार शेख,प्राईम केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.आप्पासाहेब उमदी तसेच प्रा.गौरीशंकर बिराजदार उपस्थित होते.
सोलापूरमधील शैक्षणिक,सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्त्वांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळणारा हा सन्मान विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुरस्कार : THE GLOBAL ACHIEVERS AWARD 2026.
दिनांक : 20 ते 23 सप्टेंबर 2026.
ठिकाण : PEGASUS REEF, COLOMBO, SRI LANKA
आयोजक : कर्नाटक राज्य डिजिटल मीडिया असोसिएशन
