पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही रिक्षा न थांबवता वाहतूक पोलिसाला फरफटत नेले; सोलापुरात तरुणाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : शहरातील शांती चौक येथे वाहतूक पोलिसाने थांबण्याचा इशारा करूनही ऑटो रिक्षा न थांबवता पुढे नेल्याने वाहतूक पोलिसाला फरफटत नेऊन खाली पाडल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता शांती चौक, सोलापूर येथे ही घटना घडली. विशाल राहुल परदेशी (वय २४,रा. विजय नगर,सोलापूर) हा एमएच १३ सीटी ४०५१ क्रमांकाची ऑटो रिक्षा चालवत होता.
शहर वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल क्र. ४१५ निमग्रे यांनी रिक्षा थांबविण्याचा इशारा केला. मात्र,आरोपीने रिक्षा न थांबवता पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीने रिक्षा थांबवून त्यात बसण्याचा प्रयत्न केला असता,आरोपीने त्यांना फरफटत ओढत नेले. तसेच हाताला पकडून ढकलल्याने ते रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली.
घटनेनंतर आरोपी उपचारासाठी दाखल न करता घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गु.र.नं.५०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम २८१,१२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. ६०२ राठोड करीत आहेत.
