Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार जाधव आत्महत्या प्रकरणाला तीन पत्रकारांवर गंभीर आरोप...


पत्रकार कुंदन जाधव आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; पत्नीचे तीन पत्रकारांवर गंभीर आरोप,पोलिसांकडून चौकशी सुरू

अकोला : राज्यस्तरीय वृत्तवाहिनीशी संबंधित पत्रकार कुंदन जाधव यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी अकोला शहरातील वाटुरकर लेआऊट येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता त्यांच्या पत्नी प्रियंका जाधव यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

पत्नीचे पत्रकार सहकाऱ्यांवर गंभीर आरोप - प्रियंका जाधव यांनी १२ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील तीन पत्रकारांनी कुंदन जाधव यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित पत्रकारांनी योजनाबद्ध पद्धतीने त्रास दिला,अपमान केला, वाद निर्माण केले तसेच खोटे आरोप व तक्रारी करून बदनामी केली,असा दावा त्यांनी केला आहे. या सततच्या मानसिक दबावामुळेच कुंदन जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप पत्नीने केला आहे.


खदान पोलीस ठाण्यात तक्रार - या प्रकरणी प्रियंका जाधव यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून,पत्नीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विविध पत्रकार व सामाजिक संघटनांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा,अशी मागणी करण्यात आली आहे.



नेमके कारण अद्याप तपासाधीन - कुंदन जाधव यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अधिकृत तपासातून अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्रकारिता क्षेत्रातील वाद आणि मानसिक छळाच्या आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच पुढील कारवाईबाबत स्पष्टता येणार आहे. त्यामुळे पत्नीने केलेले आरोप हे सध्या आरोपांच्या स्वरूपात असून त्यांची स्वतंत्र पोलिस चौकशी सुरू आहे,हे महत्त्वाचे आहे.

कुंदन जाधव यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक व राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी प्रियंका जाधव आणि दोन लहान मुली आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे.