अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मोठी संधी; भारतात 20 तर परदेशी शिक्षणासाठी 30 लाखांपर्यंत कर्ज
मौलाना आझाद महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 तसेच पुढील वर्षांसाठी या योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाच्या अध्यक्ष,व्यवस्थापकीय संचालक तसेच जिल्हा व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
या योजनांचा लाभ मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,शीख,पारसी आणि जैन या अधिसूचित अल्पसंख्याक समुदायातील पात्र विद्यार्थी घेऊ शकतात.
मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना - महाराष्ट्र शासनाकडून भागभांडवल स्वरूपात प्राप्त निधीतून ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत कमाल 5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असल्यास कर्जावर 3 टक्के व्याजदर असल्याचे कळविण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्जासाठी : malms.maharashtra.gov.in
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना
राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ (NMDFC), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत - भारतातील शिक्षणासाठी : 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज. परदेशातील शिक्षणासाठी : 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असल्यास 3 टक्के व्याजदर वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असल्यास पुरुषांसाठी 8 टक्के व महिलांसाठी 5 टक्के व्याजदर.
ऑनलाइन अर्जासाठी : ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची फाईल दोन प्रतींमध्ये जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात प्रत्यक्ष जमा करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांची कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो.
जिल्हा व्यवस्थापकांचे प्रतिज्ञापत्र.
आधारकार्ड.
अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
लिव्हिंग सर्टिफिकेट (LC)
चालू वर्षाचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र.
मागील वर्षाची गुणपत्रिका.
मूळ फी स्ट्रक्चर/फी कोटेशन.
फी सवलत/फ्रीशिप संबंधित कागदपत्रे.
खासगी हॉस्टेल/मेस असल्यास संबंधित मालकाचे. आधारकार्ड, लाईट बिल,मोबाईल क्रमांक,फोटो व करारनामा/प्रतिज्ञापत्र.
SBI बँक खात्याचे पासबुक.
कर्ज मंजुरीनंतर 20 कोरे चेक.
कर्ज घेतले नसल्याचे प्रतिज्ञापत्र.
सह-अर्जदार/वडिलांची कागदपत्रे : रंगीत फोटो,
आधारकार्ड, तहसीलदार यांचा मूळ उत्पन्न दाखला, राशनकार्डची रंगीत प्रत.
जामीनदाराची कागदपत्रे - जामीनदार शासकीय कर्मचारी असल्यास आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन ओळखपत्र, पगारपत्रक, नमुना 24 (अ), जामीनदाराचे प्रतिज्ञापत्र तसेच अर्जावरील फोटोवर जामीनदाराची क्रॉस स्वाक्षरी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मालमत्ता धारक जामीनदार असल्यास आधारकार्ड, 7/12 उतारा,नमुना 8,सिटी सर्वे उतारा,दुय्यम निबंधकांचे मूल्यांकन पत्र,नमुना 24-ब आणि जामीनदाराचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
एलआयसी जामीनदाराच्या बाबतीतही आवश्यक फोटो, आधारकार्ड तसेच कर्ज मंजुरीनंतर 20 कोरे चेक व वैधानिक दस्तऐवज सादर करावे लागतील.
विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - अल्पसंख्याक समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, हा या योजनांचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी योजनांची सविस्तर माहिती घेऊन वेळेत ऑनलाइन अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा कार्यालयात जमा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा. ही माहिती अल्पसंख्याक समाजातील गरजू विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवून व्हॉट्सॲप, फेसबुक आदी माध्यमांतून शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
