सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सरकार पक्ष आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी
सोलापूर : पैशांची मागणी करून सावत्र पत्नीचा छळ केल्याचा तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या पती-पत्नीची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.इंदलकर यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ६५७/२०२२ अन्वये आरोपी रमजान ताजोद्दीन मुलानी (वय ४३) व चांदबी रमजान मुलानी (वय ३९), दोघे रा.तारापूर,ता.पंढरपूर,जि. सोलापूर, यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८-अ, ३०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मयत मरजीना हिचा सन २०२० मध्ये आरोपी रमजान मुलानी याच्यासोबत विवाह झाला होता. आरोपी रमजान याचा यापूर्वी विवाह झालेला असून पहिल्या पत्नीपासून त्याला अपत्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. विवाहानंतर मरजीना ही तारापूर येथे पतीसोबत राहत होती.
फिर्यादीच्या आरोपानुसार,रमजान मुलानी व त्याची पहिली पत्नी चांदबी मुलानी हे मरजीना हिला घरगुती कारणांवरून त्रास देत,शिवीगाळ व मारहाण करीत तसेच माहेरून ६० हजार रुपये आणण्याची मागणी करीत होते. या त्रासामुळे एप्रिल २०२१ मध्ये मरजीना हिला माहेरी मोहोळ येथे आणून सोडण्यात आले होते. त्यानंतर १२ जून २०२१ रोजी रमजान हा मोहोळ येथील फिर्यादीच्या घरी आला असता त्याने पैशांबाबत विचारणा करून मरजीना हिला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर मरजीना हिने महिला तक्रार निवारण केंद्र,सोलापूर येथे तक्रार केली होती. तसेच मोहोळ न्यायालयातही प्रकरण दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी आरोपींनी मरजीना हिला चांगले वागवून सांभाळण्याबाबत लेखी म्हणणे दिल्यानंतर ती पुन्हा आरोपींसोबत नांदण्यासाठी गेली होती. मात्र,२१ फेब्रुवारी २०२२ रोजी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून मारहाण,शिवीगाळ व दमदाटी करून तिला घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर मरजीना मोहोळ येथे आपल्या वडिलांकडे आली. तिच्या तक्रारीवरून २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, १६ जून २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मरजीना हिने मोहोळ येथील घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. या घटनेनंतर आरोपींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार ६ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी तपास पूर्ण करून ६ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण सत्र खटला क्र. ३०७/२०२२ म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आले. खटल्यातील पुराव्याची सुरुवात ८ डिसेंबर २०२५ पासून झाली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा - आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी यांनी युक्तिवाद करताना सरकार पक्षाने कलम ४९८-अ व ३०६ अंतर्गत आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ वैवाहिक वाद किंवा महिलेने आत्महत्या केली म्हणून आरोपींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे मानता येणार नाही. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी आरोपींकडून ठोस कृती,हेतू किंवा जाणीवपूर्वक केलेले कृत्य सिद्ध होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच आरोपी क्र.२ चांदबी मुलानी हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी कोणती विशिष्ट कृती करण्यात आली, याबाबतही ठोस व विश्वासार्ह पुरावा नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकार पक्षाने फिर्यादी,संबंधित साक्षीदार,तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले. मात्र,आरोपींनी मयत मरजीना हिला आत्महत्येस प्रवृत्त केले किंवा जाणीवपूर्वक आत्महत्येसाठी मदत केली,ही बाब आवश्यक त्या कायदेशीर निकषांनुसार संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आले नाही.
संपूर्ण पुराव्यांचे अवलोकन व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत रमजान ताजोद्दीन मुलानी व चांदबी रमजान मुलानी यांची भादंवि कलम ४९८-अ,३०६ व ३४ अंतर्गत आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे, ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.भाग्यश्री जगदाळे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार,ॲड.प्रदिप गायकवाड,ॲड.सागर स्वामी आणि तौहीद मुलानी यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड.व्ही.एन.देशपांडे यांनी काम पाहिले.
