Ticker

6/recent/ticker-posts

संतोष पंडित यांना दिलासा; ₹२५ हजारांच्या जातमुचलका व हमीवर जामीन मंजूर

संतोष पंडित यांना पुणे न्यायालयाचा दिलासा; ₹२५ हजारांच्या जातमुचलका व हमीवर जामीन मंजूर

आक्षेपार्ह रील प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; तक्रारदारांशी संपर्क न करण्यासह विविध अटी

पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तसेच एका महिला नगरसेविकेबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य असलेली रील प्रसारित केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संतोष गजानन पंडित यांना पुणे न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलका आणि त्याच रकमेच्या हमीवर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात पंडित यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सोशल मीडिया रीलमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह व लैंगिक स्वरूपाची शेरेबाजी तसेच घटनात्मक पदावरील मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचे आरोप आहेत.


न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की,पंडित यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेली रील आणि पोस्ट तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तपासासाठी आवश्यक पुरावे आरोपीला कोठडीत ठेवूनच मिळवणे आवश्यक आहे,असे म्हणता येणार नाही,असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

तक्रारदार अथवा सरकारी पक्षाने व्यक्त केलेली आरोपीकडून तपासात हस्तक्षेप होण्याची किंवा पुन्हा अशाच प्रकारची कृती करण्याची भीती ही सध्या तर्काच्या आधारावर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे केवळ त्या कारणावरून आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवणे योग्य ठरणार नाही,असे न्यायालयाने स्पष्ट केले.


जामिनासाठी कोणत्या अटी?
न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार - संतोष पंडित यांनी २५ हजार रुपयांचा जातमुचलका द्यायचा आहे. त्याच रकमेची हमी देणे आवश्यक आहे. तक्रारदारांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधायचा नाही. साक्षीदार अथवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप किंवा छेडछाड करायची नाही. तपास प्रक्रियेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.





यापूर्वी न्यायालयीन कोठडी - या प्रकरणात अटकेनंतर पोलिसांनी तपासासाठी पंडित यांच्याकडील डिजिटल साधने जप्त केली होती. त्यात आयफोन,सिमकार्ड आणि ट्रायपॉड यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 





जामीन म्हणजे आरोपातून निर्दोष मुक्तता नाही - दरम्यान,न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी हा अंतिम निर्दोष मुक्ततेचा निर्णय नाही. संबंधित आरोपांबाबत तपास आणि त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहू शकते. न्यायालयाने जामीन देताना तपासासाठी आवश्यक पुरावे आरोपीला कोठडीत ठेवूनच मिळतील, असे नसल्याचे निरीक्षण केले आहे. महत्त्वाचे : उपलब्ध वृत्तांमध्ये संतोष पंडित यांचे वय ४८ वर्षे आणि रा.नारायण पेठ,पुणे असे नमूद करण्यात आले आहे.