Ticker

6/recent/ticker-posts

शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासांत उघड; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध व्यक्तीचा पाठलाग करून 1 लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावल्याचे तपासात निष्पन्न; दोघे ताब्यात

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जबरी चोरी,मोटारसायकल चोरी तसेच इतर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीचा एक गुन्हा अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून,त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सोलापूर शहरातील **जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाऊंडच्या भिंतीलगत, मार्केट चौकी ते हरिभाई प्रशाला या दिशेने जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या MH-13-DF-5334 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या थांबले आहेत.



मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांच्या पथकाने तत्काळ
 सदर ठिकाणी जाऊन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले

चौकशीदरम्यान त्यांची नावे मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय 36 वर्षे,व्यवसाय ड्रायव्हर,सध्या रा.घर नं. 816, उत्तर कसबा,शेटे वाडा,सोलापूर; मूळ रा.सुलेरजवळगे,ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय 18 वर्षे 20 दिवस,रा.घर नं. 816,उत्तर कसबा,शेटे वाडा, सोलापूर) अशी असल्याचे समोर आले.

चौकशीत जबरी चोरीची कबुली; 1 लाखांची रोकड जप्त
दोघांकडील पिशवीतील रकमेबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी सोलापूर शहरातील दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकानाजवळून पायी जात असलेल्या एका वयस्कर इसमाचा पाठलाग करून दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्याकडील रोख 1 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी पोलिसांची माहिती आहे.

या प्रकरणात दोन्ही संशयितांच्या ताब्यातून रोख 1,00,000 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली MH-13-DF-5334 क्रमांकाची युनिकॉर्न मोटारसायकल,किंमत 1,00,000 रुपये, असा एकूण 2,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.



सदर प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 708/2026,भा.न्या.सं.कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल असून,हा गुन्हा 12 तासांच्या आत उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे.





वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई - ही कारवाई एम.राज कुमार,पोलीस आयुक्त,सोलापूर शहर; डॉ.अश्विनी पाटील,पोलीस उपआयुक्त (गुन्हे/वि.शा.); दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त; तसेच अरविंद माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे यांच्यासह पोलीस अंमलदार वाजीद पटेल,योगेश बर्डे,संजय साळुंखे आणि शंकर याळगी यांनी सहभाग घेतला.

शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोरी व जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त व संशयितांची तपासणी सुरू असून,या कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.