सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली भव्य एकदिवसीय कायदेविषयक चर्चासत्र (लीगल कॉन्फरन्स) उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. देशातील नामवंत न्यायमूर्ती, वरिष्ठ विधिज्ञ आणि वकिलांच्या उपस्थितीमुळे परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भूषण गवई होते. प्रमुख पाहुणे म्हणून निजामोद्दीन जे.जमादार,मिलिंद जाधव,मेहरोज पठाण तसेच विनय जोशी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड.मिलिंद थोबडे,ॲड.राजेंद्र उमाप,ॲड.संग्राम देसाई तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड.आशिष देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली.
परिषदेत मान्यवरांनी न्यायव्यवस्था,वकिली व्यवसायातील व्यावसायिक नैतिकता,न्यायदान प्रक्रियेत वकिलांची भूमिका, बदलत्या कायदेशीर संकल्पना तसेच न्यायव्यवस्थेसमोरील समकालीन आव्हानांवर सखोल मार्गदर्शन केले. णन्यायव्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी वकिलांनी सतत अद्ययावत राहून सामाजिक बांधिलकी जपावी,असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला. तर सचिव ॲड.बसवराज हिंगमिरे यांनी उपस्थित मान्यवर,न्यायमूर्ती,वकील,प्राध्यापक,विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
या परिषदेस उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश,वरिष्ठ विधिज्ञ,महाराष्ट्रातील विविध बार असोसिएशनचे पदाधिकारी,वकील बंधू-भगिनी तसेच विविध विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत उपस्थितांनी परिषदेचे भरभरून कौतुक केले.
