निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधी व शासकीय रकमेच्या मंजुरीसाठी ₹१० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; यापूर्वी ₹६ हजार स्वीकारल्याचीही नोंद.
सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक पंकज जगन्नाथ महाले (वय ३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फंड,पेन्शन व इतर शासकीय रकमेच्या मंजुरीसाठी एकूण ₹१० हजारांची लाच मागितल्याची तक्रार होती. त्यापैकी यापूर्वी ₹६ हजार स्वीकारल्यानंतर उर्वरित ₹४ हजार स्वीकारताना एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.
ही कारवाई ३० जून २०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण व पथकाने ही कारवाई केली.
