मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोलापूरच्या विकासाला गती; उड्डाणपूल,पाणीपुरवठा,आयटी पार्क आणि विमानसेवेचे प्रश्न मार्गी
सोलापूर : सोलापूर शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना,आयटी पार्क, विमानसेवा, ई-बस तसेच महापालिकेतील रोजंदारी व वाहनचालकांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मार्गी लागला. या बैठकीत विविध विभागांना निश्चित कालमर्यादेत निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
ही बैठक पावसाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उड्डाणपुलांना अखेर हिरवा कंदील - सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या रेल्वे, पोस्ट व राज्य शासनाच्या जागा पुढील १५ दिवसांत ताब्यात घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ऑगस्टपूर्वी कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या मालकीच्या जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१,४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला वेग - शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी मंजूर झालेल्या १,४०० कोटी रुपयांच्या योजनेची निविदा १५ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करून ३० नोव्हेंबरपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता असल्याने या योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील राज्यस्तरीय अडथळे दूर झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली असून केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
विमानसेवा पूर्ववत करण्याचे निर्देश - सोलापूरची विमानसेवा नियमित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. विमानसेवा बंद ठेवणाऱ्या संबंधित कंपनीला नोटीस देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दृश्यमानता उपलब्ध असताना विमानसेवा सुरू राहिलीच पाहिजे,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. नाईट लँडिंग,विमानतळ परिसरातील अतिक्रमण तसेच बोरामणी विमानतळ प्रकल्पाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
आयटी पार्कसाठी सात दिवसांत जागा - सोलापूरमध्ये प्रस्तावित आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची जागा सात दिवसांच्या आत विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शहरातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
१५ ऑगस्टपर्यंत २५ ई-बस - सोलापूर शहरासाठी किमान २५ ई-बस १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याशिवाय महापालिकेतील २४९ रोजंदारी कर्मचारी व वाहनचालकांना कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्या.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती - पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की,अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलांसह विविध विकासकामांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा - आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले की, शहरातील उड्डाणपूल,पाणीपुरवठा, आयटी पार्क,विमानसेवा,ई-बस तसेच महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल.
विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेतलेले निर्णय सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केले. उड्डाणपूल, पाणीपुरवठा, आयटी पार्क, विमानसेवा आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
