सोलापूर : वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने 'एकता महिला मंच' च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'एक गाव-एक वडाचे झाड' या स्तुत्य व पर्यावरणपूरक उपक्रमाला सोमवारी (दि. २९ जून २०२६) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेअंतर्गत दोन दिवसांपूर्वी विविध गावांतील महिला सदस्यांना वडाची रोपे देण्यात आली होती. त्या रोपांचे आज वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भक्तिभावाने पूजन करून रोपण करण्यात आले. निसर्गाला भरपूर प्राणवायू (ऑक्सिजन) देणारा,विस्तीर्ण शीतल सावली देणारा आणि पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वटवृक्ष केवळ लावायचा नाही, तर त्याचे वर्षभर जबाबदारीने संगोपन करायचे,अशी सामूहिक शपथ यावेळी उपस्थित महिलांनी घेतली.
या उपक्रमांतर्गत आंबेगाव (ता. बार्शी), खेडभाळवणी (ता. पंढरपूर), डोणगाव (ता. उत्तर सोलापूर), दहिटणे, कारी, जामगाव (आ.) आणि शेळगाव (आर.) (ता. बार्शी) या गावांमध्ये वटवृक्षांचे पूजन करून रोपण करण्यात आले.
आंबेगाव (ता.बार्शी) येथे वर्षा साळुंखे,पूजा काळे,सरस्वती यादव,सुवर्णा साळुंखे,प्रमिला सुरवसे,वंदना करंडे,मनीषा ढवळे व अनिता ढवळे उपस्थित होत्या. खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथे मीनाक्षी साळुंखे,स्वाती साळुंखे,सुरेखा साळुंखे, साधना साळुंखे,धनश्री साळुंखे,कविता साळुंखे,रुक्मिणी साळुंखे,राणी साळुंखे,सुनिता साळुंखे व लक्ष्मी साळुंखे यांनी सहभाग नोंदविला.
डोणगाव (ता.उत्तर सोलापूर) येथे सावित्री पाटील,प्रीती येरनाळे व संजीवनी शेळके उपस्थित होत्या. दहिटणे (ता. बार्शी) येथे एकता महिला मंचच्या जिल्हा प्रमुख लक्ष्मी सुतार यांच्यासह वनिता जगझाप,बाई कावरे व केसर जगझाप यांनी सहभाग घेतला. कारी (ता.बार्शी) येथे स्वाती जोगदंडकर, प्रतिला जाधव,सुवर्णा व्हटकर,स्वाती व्हटकर,प्रियंका शिंदे व अन्य सदस्यांनी रोपण केले. जामगाव (आ.) (ता.बार्शी) येथे सरिता कुलकर्णी व स्नेहल तळेकर उपस्थित होत्या. तर शेळगाव (आर.) (ता.बार्शी) येथे गीतांजली जोशी,आशा विभुते,राजश्री बादगुडे,रंजना गवळी,राणी गवळी व अन्य सदस्यांनी वटवृक्षाचे पूजन करून रोपण केले.
एकता महिला मंचच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्याबरोबरच वटपौर्णिमेच्या धार्मिक परंपरेला सामाजिक व पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात प्रत्येक गावात किमान एक भव्य वटवृक्ष उभा राहावा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांनीही "झाड लावू, झाड जगवू" हा संकल्प करत वटवृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
