सोलापूर : शासनाने विधवा महिलांना यापुढे "एकल महिला" या नावाने संबोधित करण्याचे परिपत्रक जारी केल्यानंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड ऑफ विडोज व्वा (WOW) संस्थेच्या वतीने महापालिका हिरवळीवर एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे होत्या. प्रारंभी महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रांत संघर्ष करून आपले जीवन सक्षमपणे उभे करणाऱ्या अनेक एकल महिलांचा हळदीकुंकू लावून सन्मान करण्यात आला.
यावेळी आबेदा नीलमेघम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पतीच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. आज त्यांची मुले उच्च पदांवर कार्यरत असून त्यापैकी एक मुलगा अमेरिकेत कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास सायरा शेख,लता ढेरे,मार्था आसादे,शोभा गायकवाड,शबाना मुलाणी,मोनिका सरकार,शशिकला कसपटे,शारदा मसूती,पुष्पा हलकूड,स्वाती मुकणार,लक्ष्मी माने,कांचन चौगुले,मदिना पटेल यांच्यासह संस्थेच्या अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांनी शासनाने विधवा महिलांसाठी "एकल महिला" हे सन्मानजनक संबोधन स्वीकारल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजात या महिलांना सन्मानाची व समानतेची वागणूक मिळावी,यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
