पुणे विभागात ११३ परवान्यांवर कारवाई; ७ केंद्रांवर गुन्हे दाखल
सोलापूर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द आणि ७ केंद्रांविरुद्ध गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ पर्यंत पुणे विभागातील २ हजार ५७६ परवानाधारक खत विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८१ प्रकरणांमध्ये अनियमितता आणि काळाबाजाराचे प्रकार आढळून आले. याप्रकरणी २७७ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हानिहाय कारवाई पुणे जिल्हा :
६५० केंद्रांची तपासणी
७१ प्रकरणांमध्ये अनियमितता
२७ परवाने निलंबित
अहिल्यानगर जिल्हा :
८१२ केंद्रांची तपासणी
१६ परवाने निलंबित
२ परवाने रद्द
३ केंद्रांवर गुन्हे दाखल
सोलापूर जिल्हा :
१,१२९ केंद्रांची तपासणी
१८ खत नमुने निकृष्ट आढळले
६४ परवाने निलंबित
४ परवाने रद्द
४ केंद्रांवर गुन्हे दाखल
औद्योगिक वापरावरही नजर अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी कृषी विभागाने विभागातील ४२ औद्योगिक युनिट्सची तपासणी केली आहे. खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातूनच खतांची खरेदी करावी तसेच कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान विजयकुमार राऊत, निलेश गढरी आणि अतुल जाधव उपस्थित होते.
