भविष्य निर्वाह निधी मंजुरीसाठी ६ हजारांची लाच घेताना तीन अधिकारी-कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधून ५ लाख रुपये काढण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षण विभाग,सोलापूर येथील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून ५ लाख रुपये काढण्यासाठी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर येथे अर्ज केला होता. संबंधित रक्कम मंजूर करण्यासाठी अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड यांनी १ हजार रुपये, वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दादू मेटकरी यांनी ४ हजार रुपये आणि ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले यांनी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी १५ जून २०२६ रोजी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने १८ जून २०२६ रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान ग्रंथपाल विक्रम बारबोले यांनी तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५), वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दादू मेटकरी (वय ४८) आणि ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जेल रोड पोलीस ठाण्यात सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत योगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार,पोलीस निरीक्षक रविंद्र लंगमाते व एसीबी सोलापूरच्या पथकाने केली.
