सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातील द्विवार्षिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार दि. 18 जून 2026 रोजी मतदान तर दि. 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ड्राय डे घोषित केला आहे.
यानुसार महानगरपालिका सोलापूर हद्द, कुर्डूवाडी नगरपरिषद हद्द, पंढरपूर नगरपरिषद हद्द, मंगळवेढा नगरपरिषद हद्द व अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने,बार,क्लब व संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना दि. 16 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बंद राहतील. दि. 17 जून 2026 रोजी संपूर्ण दिवस तसेच दि. 18 जून 2026 रोजी मतदान संपेपर्यंत, म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच महानगरपालिका सोलापूर हद्दीतील सर्व संबंधित आस्थापना दि. 22 जून 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहतील.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 54 व 56 नुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते,असे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
