Ticker

6/recent/ticker-posts

लेटकमर,लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!

महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक उपस्थितीसाठी कडक नियमावली

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीला अधिक बळकटी देण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थितीबाबत कठोर पावले उचलली आहेत. कार्यालयात उशिरा येणारे तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जाणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता रजा कपात आणि आवश्यकतेनुसार वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.


 
या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत होती. मात्र आता कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालय सोडून जाणाऱ्यांच्याही बायोमेट्रिक नोंदींची तपासणी करून त्यांच्यावर समान कारवाई केली जाणार आहे. आदेशानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या नियुक्तीच्या कार्यालयातील बायोमेट्रिक यंत्रावर कार्यालयात येताना आणि जाताना उपस्थितीची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे.            
     

        

शासनाने मंजूर केलेल्या १० मिनिटांच्या ग्रेस पिरियडनंतर एखादा कर्मचारी महिन्यात तीन वेळा उशिरा आल्यास किंवा तीन वेळा कार्यालयीन वेळेपूर्वी निघून गेल्यास त्याच्या नावावर एक दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकण्यात येणार आहे. किरकोळ रजा उपलब्ध नसल्यास अर्जित रजा आणि तीही उपलब्ध नसल्यास एक दिवसाचे वेतन कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना दोन वेळा लेखी ताकीद देऊनही सुधारणा न झाल्यास विभागप्रमुखांकडून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. उशिरा येणे व लवकर जाणे याच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना आस्थापना विभागाला देण्यात आल्या आहेत.