सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या कार्यालयात थकबाकीच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळाचे शौकत पठाण यांना आयुक्तांनी केबीनबाहेर जाण्यास सांगितल्याची घटना घडली. या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू असून,थकबाकी वसुलीबाबत आयुक्तांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे अनेक स्तरांतून स्वागत केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना शुभेच्छा देण्यासाठी काही विद्यमान व माजी नगरसेवकांसह शौकत पठाण हे आयुक्तांच्या भेटीस आले होते. मात्र,भेटीदरम्यान टी.पी.०३ मधील फायनल प्लॉट क्रमांक ४४ वरील चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित जागेवरील उद्यान आणि इम्पिरियल पॅलेस संदर्भातील थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,संबंधित संस्थेकडे सुमारे ३० ते ३१ लाख रुपयांची थकबाकी अद्याप बाकी आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. एकूण ५५ लाख रुपयांच्या थकबाकीपैकी २५ लाख रुपये भरले असले तरी उर्वरित रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे थकबाकी तत्काळ भरण्यात यावी, अन्यथा उद्यान सील करण्याची कारवाई केली जाईल,अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा - संस्मरण उद्यानातील वृक्षतोड प्रकरण गाजतेय; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
मुदतवाढीच्या मागणीवरून चर्चा सुरू असताना शौकत पठाण यांनी आयुक्तांशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यानंतर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कठोर भूमिका घेत शौकत पठाण यांना केबीनमधून बाहेर जाण्यास सांगितले.
महापालिकेने यापूर्वीच संबंधित संस्थेला थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली होती. तसेच, थकबाकीची संपूर्ण रक्कम जमा होईपर्यंत कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि वसुली मोहिमेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान,नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत थकबाकी वसुलीबाबत आयुक्तांनी दाखविलेल्या ठाम भूमिकेचे शहरातील विविध स्तरांतून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
