सोलापूर : टी.पी. 3 फायनल प्लॉट क्रमांक 44 येथील "संस्मरण उद्यान" (द इम्पिरियल पॅलेस हॉल परिसर) येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून,या प्रकरणी माहिती अधिकारांतर्गत वारंवार मागणी करूनही संबंधित माहिती देण्यात येत नसल्याने महापालिकेच्या उद्यान विभाग आणि भूमी मालमत्ता विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. माहिती अधिकारांतर्गत अर्ज तसेच अपील सुनावणीनंतर माहिती देण्याचे आदेश होऊनही संबंधित विभागांकडून माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय दडवले जात आहे,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान,सलगर वस्ती येथील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात संबंधित जागा मालकांवर कारवाई व दंडात्मक कार्यवाही आदेश दिले आहे. मात्र,महापालिकेच्या चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेतील झाडांची तोड झाल्याच्या आरोपांवर कोणती कारवाई करण्यात आली,याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या उद्यानात लावण्यात आलेली अनेक झाडे माजी सैनिकांच्या स्मरणार्थ लावण्यात आली होती,अशी चर्चा शहरात सुरू आहे. मात्र,हे उद्यान नेमके कोणाच्या संस्मरणार्थ उभारण्यात आले आहे,याची अधिकृत माहितीही महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
याचबरोबर,शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला संबंधित जागा नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. संस्थेकडे महापालिकेची लाखो रुपयांची थकबाकी असल्याचे सांगितले जात असून, तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांनी मुदत संपल्याने जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही आजपर्यंत महापालिकेने जागा ताब्यात का घेतली नाही,याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
सोलापूरकरांनी महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी,उद्यानाची पाहणी करावी तसेच महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते,सार्वजनिक जागा,पर्यावरण आणि महापालिकेच्या मालमत्तेशी संबंधित या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून,दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
