Ticker

6/recent/ticker-posts

बाल संरक्षणासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पुढाकार; कार्यशाळेत बालविवाह रोखण्याच्या कार्याचे विशेष कौतुक


सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बाल कल्याण पोलीस अधिकारी (CWPO) आणि विशेष बाल पोलीस पथक (SJPU) यांच्यासाठी बाल संरक्षण विषयक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेत बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल न्याय कायदा आणि बालविवाह प्रतिबंध यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत बाल कल्याण समिती, सोलापूरचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी "पोलीस काका- पोलीस दीदी" संकल्पना, बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, त्याअंतर्गत नियमावली आणि बालकांशी संबंधित प्रकरणे पोलीस ठाण्यात आल्यानंतर ती संवेदनशीलतेने व कायदेशीर चौकटीत कशी हाताळावीत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यशाळेस सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज अधोरेखित केली. तसेच "पोलीस काका- पोलीस दीदी" उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला.

अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्यात येतील,असे सांगितले.





कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भरोसा सेल, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल वरुदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी मागील एका महिन्यात पंढरपूर विभागात सुमारे 25 बालविवाह रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे तसेच निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव-रावण यांचे विशेष कौतुक केले.


तसेच संपूर्ण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात संवेदनशील आणि तत्पर भूमिका घेत सुमारे 50 बालविवाह रोखल्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख संकेत देवळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी बाल संरक्षण क्षेत्रात पोलीस यंत्रणेने अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यशाळेमुळे बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कायदेशीर ज्ञान, संवेदनशीलता आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले असून, बालविवाह आणि बाल अत्याचार प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.