Ticker

6/recent/ticker-posts

आरोपींनी सोडली लाज; फक्त दोन हजारांच्या लाचेसाठी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


पंढरपूर : जन्म-मृत्यू नोंद प्रकरणात तहसीलदारांकडून आदेश मिळवून देण्यासाठी केवळ दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह एका खासगी इसमाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या विविध पक्षकारांच्या वतीने जन्म-मृत्यू नोंद होण्यासाठी तहसील कार्यालय,पंढरपूर येथे प्रकरणे दाखल केली होती. या प्रकरणांमध्ये तहसीलदारांसमोर लवकर सुनावणी घेऊन आदेश मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक अलीफ शमशुद्दीन सुतार (वय २९) आणि खासगी इसम मारुती ज्ञानोबा वाघमारे (वय ५०) यांनी तक्रारदारांकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.



तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर २९ मे व १ जून २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १ जून रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईत महसूल सहाय्यक अलीफ सुतार यांनी दोन हजार रुपयांची लाच प्रत्यक्ष स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. आरोपी अलीफ सुतार हे तहसील कार्यालय,पंढरपूर येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांचे वास्तव्य मंगळवेढा येथील दामाजी नगर परिसरात आहे. तर मारुती वाघमारे हे मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथील रहिवासी आहेत.



सदर कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते,पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या एजंटांविरोधात नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.