पुणे : मध्य रेल्वेची सर्वाधिक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गाड्यांपैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनने १ जून २०२६ रोजी आपल्या सेवेची ९६ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करून ९७ व्या गौरवशाली वर्षात पदार्पण केले. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या ऐतिहासिक गाडीचा वर्धापन दिन पुणे रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
१ जून १९३० रोजी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने (जीआयपीआर) मुंबई–पुणे मार्गावर सुरू केलेली डेक्कन क्वीन ही त्या काळातील पहिली डिलक्स गाडी होती. डेक्कन प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या विशेष सेवेच्या गौरवार्थ तिला “डेक्कन क्वीन” अर्थात “डेक्कनची राणी” हे नाव देण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त पुणे स्थानकावर १२१२४ पुणे–मुंबई डेक्कन क्वीनच्या प्रस्थानावेळी तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १२१२३ मुंबई–पुणे डेक्कन क्वीनच्या प्रस्थानावेळी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविलेल्या गाडीसमोर रेल्वे अधिकारी,कर्मचारी,रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापून हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला.
प्रवाशांच्या सुविधांसाठी आधुनिकीकरण - यंदाच्या वर्षात डेक्कन क्वीनमधील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी भर घालण्यात आली आहे. गाडीतील ऐतिहासिक ओळख जपून डायनिंग कारचे नूतनीकरण करण्यात आले असून आधुनिक फर्निचर आणि आकर्षक अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.
स्वच्छतागृहांमध्ये विनाइल फ्लोअरिंग,ड्युरो-वाईप मॅट्स, साबण व टिश्यू डिस्पेंसर यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच डब्यांची अंतर्गत रचना,छत आणि पॅनल बोर्ड नव्या आकर्षक व चैतन्यमय थीममध्ये विकसित करण्यात आले आहेत.
ट्रेन महोत्सवात इतिहासाचा जागर - २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘ट्रेन महोत्सवा’अंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी,प्रवासी,रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. १९३० पासून आजपर्यंतच्या डेक्कन क्वीनच्या गौरवशाली प्रवासाचे दर्शन घडविणारे प्रभावी दृकश्राव्य सादरीकरण यावेळी सादर करण्यात आले.
सात डब्यांपासून सोळा डब्यांपर्यंतचा प्रवास - डेक्कन क्वीनची सुरुवात दोन रेक्ससह करण्यात आली होती. प्रत्येक रेकमध्ये सात डबे होते. एक रेक चंदेरी रंगाचा व शेंदरी नक्षीयुक्त होता,तर दुसरा शाही निळ्या रंगाचा आणि सोनेरी पट्ट्यांनी सजलेला होता.
मूळ डब्यांचे अंडरफ्रेम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आले होते, तर डब्यांची बॉडी माटुंगा कार्यशाळेत तयार करण्यात आली होती. १९६६ मध्ये पेरांबूर येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने बनविलेल्या अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडी असलेल्या डब्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर डब्यांची संख्या ७ वरून १२ करण्यात आली.
१९९५ मध्ये एअर-ब्रेक रेक्सची भर पडली, तर १५ ऑगस्ट २०२१ पासून पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला. जून २०२२ मध्ये सर्व पारंपरिक डब्यांच्या जागी आधुनिक एलएचबी डबे बसविण्यात आले. एलईडी प्रकाशयोजना, बायो-टॉयलेट्स, ब्रेल इंडिकेटर्स यांसारख्या सुविधा या डब्यांमध्ये उपलब्ध आहेत.
सध्या डेक्कन क्वीन १६ डब्यांच्या सुधारित रचनेसह धावत असून त्यात ४ एसी चेअर कार, ८ सेकंड क्लास चेअर कार, १ व्हिस्टाडोम कोच, १ डायनिंग कार, १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कारचा समावेश आहे.
अनेक ‘प्रथम’ कामगिरींचा मान डेक्कन क्वीनच्या नावावर भारतीय रेल्वेच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदविले गेले आहेत.
रोलर-बेअरिंग डब्यांचे पहिले संचालन स्वयंचलित वीज निर्मिती करणाऱ्या ११० व्होल्ट प्रणालीचा पहिला वापर - प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या चेअर कारची पहिली ओळख भारतातील एकमेव डायनिंग कार असलेली ट्रेन डेक्कन क्वीनची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही भारतातील सध्या डायनिंग कारची सुविधा असलेली एकमेव रेल्वेगाडी आहे. प्रवाशांना टेबल सर्व्हिससह मायक्रोवेव्ह ओव्हन,डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आरामदायी खुर्च्या आणि आकर्षक सजावटीमुळे डायनिंग कार हा प्रवाशांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरतो.
दोन शहरांना जोडणारा भावनिक दुवा - मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील प्रवाशांसाठी डेक्कन क्वीन ही केवळ रेल्वेगाडी नसून एक भावनिक नाते बनली आहे. वक्तशीरपणा,उत्कृष्ट सेवा आणि आधुनिक सुविधांमुळे गेल्या ९६ वर्षांत या गाडीने लाखो प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे.
आजही “डेक्कनची राणी” म्हणून ओळखली जाणारी ही गाडी महाराष्ट्राच्या रेल्वे इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय आहे. सेवेच्या ९७ व्या वर्षात पदार्पण करताना डेक्कन क्वीनने आपल्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची जोड देत प्रवाशांच्या मनातील स्थान अधिक भक्कम केले आहे.
