Ticker

6/recent/ticker-posts

पॉक्सो यद्यावरील मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; अशा कार्यशाळा वारंवार आयोजित करू - डॉ. जयश्री ढवळे



सोलापूर : बालकांच्या हक्कांचे संरक्षण,बालविवाह प्रतिबंध आणि लैंगिक अत्याचाराविरोधातील कायद्यांबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला व नवजात शिशु रुग्णालय,गुरुनानक चौक,सोलापूर येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,जिल्हा बाल संरक्षण कक्ष,सोलापूर आणि महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संबंधित कायद्यांबाबतची माहिती देणे,कायदेशीर प्रक्रियेतील सुसूत्रता वाढविणे तसेच बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करणे हा होता.



दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या सभागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी,परिचारिका व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदी,बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका, अहवाल नोंदणी प्रक्रिया,पुरावे संकलन आणि पीडित बालकांना संवेदनशीलतेने मदत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर बोलताना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, "POCSO कायद्याबद्दल संवेदनशीलता आणि याविषयीचे तुमचे भाषण खूप चांगले होते. धन्यवाद. आम्ही भविष्यात अशा कार्यशाळा वारंवार आयोजित करू." त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रशिक्षण कार्यक्रमाची उपयुक्तता आणि प्रभाव अधोरेखित झाला.



या कार्यशाळेमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बालकांच्या हक्कांशी संबंधित कायदे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली असून, भविष्यात अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे बाल संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महात्मा गांधी प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. उपस्थितांनीही अशा विषयांवरील नियमित प्रशिक्षणाची गरज व्यक्त करत कार्यशाळेचे स्वागत केले.