पुणे : हज आणि उमरा यात्रेसाठी नोंदणी केलेल्या अनेक मुस्लिम यात्रेकरूंची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक अमीर सरदार शेख तब्बल २० दिवस फरार राहिल्यानंतर ३ जून रोजी स्वतः कोंढवा पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील पुढील कारवाईकडे फसवणूकग्रस्त यात्रेकरूंचे लक्ष लागले आहे.
अमीर शेख याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या भागीदारांनी भवानी पेठ येथील चुडामण तालिम परिसरातील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय रिकामे करून तेथून काढता पाय घेतल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे हज यात्रेकरूंमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती.
या प्रकरणात आतापर्यंत ५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून,अनेक फसवणूकग्रस्त नागरिकांनी अद्यापही पोलिसांकडे अधिकृत तक्रार केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. अमीर शेख पोलिसांसमोर हजर झाला असला तरी त्याची पत्नी आणि इतर काही संबंधित व्यक्ती अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान,ॲड.समीर शेख यांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी,असे त्यांनी म्हटले आहे.
"हिरा गोल्ड प्रकरणातील अनुभव लक्षात घेता न्याय मिळवण्यासाठी तक्रार नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पीडितांनी पुढे येऊन आपली तक्रार दाखल करावी," असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान,पोलिस या प्रकरणात अमीर शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करतात,तसेच फसवणूक झालेल्या यात्रेकरूंना न्याय कसा मिळतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हज-उमरा यात्रेकरूंना सावध राहण्याचे आवाहन - या घटनेच्या पार्श्वभूमीवर हज आणि उमरा यात्रेसाठी नोंदणी करताना संबंधित ट्रॅव्हल एजन्सीची अधिकृत मान्यता,कार्यालयीन नोंदणी,व्यवहारांची कागदपत्रे आणि पावत्या यांची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिस किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
