मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या जिद्द,स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनलेल्या मिट्टी कॅफेमध्ये आज उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मिट्टी कॅफेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
"Magic of Abilities" या संकल्पनेवर आधारित मिट्टी कॅफे दिव्यांग व्यक्तींना रोजगार,स्वाभिमान आणि समाजात समान संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅफेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंद,उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन प्रेरणादायी क्षण अनुभवले.
मिट्टी कॅफे हा केवळ एक उपहारगृह नसून दिव्यांगांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणारी आणि त्यांना स्वावलंबी बनविणारी एक सामाजिक चळवळ असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे येथील कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढला असून त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.
