सोलापूर : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ‘शरण साहित्य अध्यासन’साठी स्वतंत्र व अद्ययावत वास्तू उभारण्यात आल्याने शरण साहित्य,महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि सामाजिक समतेचा संदेश जतन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना राष्ट्रीय लिंगायत महामंचचे महाराष्ट्र अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी व्यक्त केली.
मात्र,महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात वीरशैव-लिंगायत समाजाचे वास्तव्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या विकासासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाजाचे दोन आमदार असतानाही या विषयाकडे आवश्यक ते लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र अद्ययावत व आधुनिक स्वरूपात कधी उभारले जाणार,असा प्रश्न संपूर्ण वीरशैव-लिंगायत समाजाच्या मनात असल्याचे हत्तुरे यांनी सांगितले. संशोधन,वचन साहित्याचा अभ्यास,सामाजिक समता आणि बसव तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतंत्र व सुसज्ज अध्यासन केंद्र उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासन,लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रशासन यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या उन्नतीसाठी तातडीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
ही माहिती महाराष्ट्र दर्पण २४ न्यूज (एमडी २४ न्यूज) शी बोलताना राष्ट्रीय लिंगायत महामंच, महाराष्ट्रचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
