सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या काळात आदर्श प्रशासकीय व्यवस्था उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्व अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र आणत स्वराज्य उभारण्याचे ऐतिहासिक कार्य शिवरायांनी केले,असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य,महापौर विनायक कोंड्याल,उपाध्यक्ष इंद्रजित पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती ॲड. अमृता वाघे,कृती व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी,उत्तर पंचायत समितीच्या सभापती तेजस्वीही बोराडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्वराज्य गुढीचे पूजनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आपल्या भाषणात गोरे म्हणाले की,शिवछत्रपतींनी राज्यकारभारासाठी उभारलेली व्यवस्था आजही आदर्श मानली जाते. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन लोककल्याणासाठी कार्यरत आहे.
कार्यक्रमात मोहोळच्या स्वानंद परिवारातील महेश कोठीवाले, सायली साठे,बापूसाहेब दळवी आणि कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी शिवगीतांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रारंभी वंदे मातरम्,राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते शिवचरित्र ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागाने शिवराज्य दिनाचे नेटके आयोजन केले होते. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिवचरित्र भेट देण्याची अभिनव संकल्पना राबविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
