मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जून २०२६ पासून मुंबईतील विधान भवनात सुरू होणार असून १० जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. सुमारे तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय गाजण्याची शक्यता असून विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र या निर्णयातील काही अटींवरून विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,त्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रथम उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो,अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.
याशिवाय राज्यातील शेतकरी प्रश्न,पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा,विविध विकासकामे,बेरोजगारी,महागाई तसेच कायदा-सुव्यवस्थेचे मुद्देही अधिवेशनात चर्चेचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान,सत्ताधारी पक्ष सरकारच्या विविध योजनांची आणि विकासकामांची माहिती सभागृहात मांडण्याच्या तयारीत असून विरोधकांकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
