Ticker

6/recent/ticker-posts

"वक्फ बोर्डाच्या जमिनींचा मुस्लिम विद्यार्थी व समाजाला नेमका काय लाभ? - सोलापुरातील ‘वक्फ संवाद’ कार्यक्रमात नागरिकांचा सवाल"



सोलापूर : (सैफन शेख) सोलापूर शहरातील वक्फ बोर्डाच्या जमिनींचा मुस्लिम विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच समाजाच्या विकासासाठी नेमका किती आणि कसा उपयोग होत आहे,याची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडावी,अशी मागणी सोलापुरातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) समीर गुलामनबी काझी यांच्यासमोर केली.

अंजुमने इस्लाहूल मुसलमीन मुनताझिम कमिटी व फॉरेस्ट ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित वार्षिक शैक्षणिक गौरव समारंभ २०२६ अंतर्गत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘वक्फ संवाद कार्यक्रम’ देखील आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शनिवारी, १३ जून २०२६ रोजी सायंकाळी फॉरेस्ट मशीद हॉल,फॉरेस्ट, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.


कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी वक्फ बोर्डाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. मोहरम कमिटी, दर्गे, मशिदी तसेच वक्फ बोर्डाच्या मालमत्तांशी संबंधित वादांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सोलापूरमधील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, त्या मालमत्तांमधून कोणते उपक्रम राबविले जातात, त्याचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना व समाजघटकांना मिळतो, तसेच प्रत्यक्ष लाभार्थी कोण आहेत, याबाबत नागरिकांनी स्पष्ट माहितीची मागणी केली.


वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा उपयोग शिक्षण,सामाजिक विकास,शिष्यवृत्ती,आरोग्य व इतर लोकहिताच्या उपक्रमांसाठी कितपत केला जात आहे, याबाबत पारदर्शक माहिती सोलापूरकरांसमोर ठेवावी,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने तपशीलवार माहिती सार्वजनिक करावी,अशी चर्चाही संवाद कार्यक्रमात रंगली. कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती व संवाद वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.