Ticker

6/recent/ticker-posts

पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोलापुरातील खाजगी सोनोग्राफी केंद्रांवर राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची अचानक तपासणी


सोलापूर : पीसीपीएनडीटी (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी मोहीम राबविली.

दि. 27 मे 2026 रोजी आरोग्य भवन,आरोग्य सेवा आयुक्तालय येथे झालेल्या राज्य पर्यवेक्षीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी विविध सोनोग्राफी केंद्रांच्या कामकाजाची पाहणी करताना रुग्ण नोंदी,ऑनलाइन ‘एफ’ फॉर्म,आवश्यक कागदपत्रे,कायद्याचे पालन तसेच केंद्रांमधील इतर विविध बाबींची सखोल तपासणी केली.


याबाबत माहिती देताना डॉ.दिगंबर कानगुले,उपसंचालक (वि.ल.टो.),राज्य कुटुंब कल्याण कार्यालय,पुणे यांनी सांगितले की,पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,लिंग निवड प्रतिबंध आणि गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी अशा अचानक तपासण्या नियमितपणे केल्या जात आहेत.

दरम्यान,जिल्ह्यातील कोणतेही नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास किंवा अनधिकृतपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी केले आहे. यासाठी www.amchimulgimaha.in⁠� या संकेतस्थळावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1800-233-4475 आणि 104 वर संपर्क साधता येणार आहे.

या तपासणी दौऱ्यादरम्यान जिल्हास्तरीय अधिकारी तसेच संबंधित सोनोग्राफी केंद्रांचे डॉक्टर उपस्थित होते.