छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेची अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत शासन संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. तसेच, प्रशासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुटखा माफियांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,असा कठोर इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणातील आरोपी तसेच संबंधित गुटखा माफियांवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मंत्री झिरवाळ यांनी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत. अशा प्रकारच्या दबावतंत्राला बळी न पडता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे," असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
या घटनेमुळे गुटखा माफियांच्या वाढत्या धाडसाबाबत चिंता व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
