सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांतील नागरिकांच्या दीर्घकालीन वाहतूक समस्येवर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभावी पाठपुरावा करून तोडगा काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.
गुरुदेव दत्त नगर १ ते ५, शिक्षक सोसायटी,हेरिटेज फॉर्म, रोहिणी नगर भाग १ व २, ओम गर्जना चौक,द्वारका नगर, उद्धव नगर आदी परिसरातील नागरिकांना डी-मार्ट, आयएमएस कॉलेज, आसरा चौक आदी ठिकाणी जाण्यासाठी ओम गर्जना चौकाकडून मोठा वळसा घालावा लागत होता. कृष्णा कॉलनीमधून जाणारा महत्त्वाचा डांबरी रस्ता ड्रेनेजच्या कामामुळे खोदून ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी तसेच शालेय बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही समस्या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेविका चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन सादर करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत संबंधित प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली. लक्ष्मी कन्स्ट्रक्शनमार्फत कृष्णा कॉलनीतील रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात आले. तसेच झोन क्रमांक ५ कार्यालयाच्या वतीने रस्त्यालगत वाढलेली झाडी-झुडपे हटविण्यात आली. पावसामुळे चिखल होणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून रोलिंगचे कामही करण्यात आले.
या कामांमुळे परिसरातील नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि शालेय बस चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की,या समस्येबाबत अनेक वेळा महानगरपालिका,झोन कार्यालय आणि नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र,माजी नगरसेविका चव्हाण यांना केवळ दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रशासनाकडून काम पूर्ण करून घेतले.
हेही वाचा - संस्मरण उद्यानातील वृक्षतोड प्रकरण गाजतेय; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
नागरिकांनी पुढे सांगितले की,ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क दरम्यानचा ड्रेनेजसाठी खोदलेला रस्ता अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून ही समस्या देखील राजश्री चव्हाण यांच्या माध्यमातूनच मार्गी लागू शकेल,अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, सदर कामासाठी झोन क्रमांक ५ कार्यालयातील मुकादम बाळासाहेब गोतसुर्वे,देशमुख,कट्टीमणी आणि लोंढे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे नागरिकांनी नमूद केले.
प्रभाग २६ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या माजी नगरसेविका चव्हाण यांच्या कार्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांची दीर्घकालीन समस्या मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
