Ticker

6/recent/ticker-posts

मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय : प्रशासकीय विभागांची पुनर्रचना,नवीन महाविद्यालयांना मान्यता आणि MIDCच्या कर्जउभारणी अधिकारात वाढ


मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या प्रशासन, शिक्षण, कररचना आणि औद्योगिक विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय विभागांची पुनर्रचना, नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, वस्तू व सेवा कर (GST) कायद्यात सुधारणा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्जउभारणी अधिकारात वाढ करण्याचे निर्णय घेण्यात आले.

प्रशासकीय विभागांची पुनर्रचना; विभागांची संख्या ३३ वरून ४३ मंत्रिमंडळाने राज्यातील प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या काही विभागांतील उपविभागांना स्वतंत्र विभागाचा दर्जा मिळणार आहे. राज्यात सध्या ३३ प्रशासकीय विभाग कार्यरत असून ही संख्या वाढून ४३ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्रचनेमुळे कोणतीही नवीन पदनिर्मिती केली जाणार नाही. मात्र विभागांचे कामकाज अधिक सुलभ,कार्यक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. तसेच निर्णयप्रक्रियेला वेग येऊन नागरिकांना अधिक प्रभावी प्रशासनाचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.


नवीन महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचा मार्ग मोकळा - राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देणे,महाविद्यालयांच्या विस्तारासाठी नवीन विद्याशाखा सुरू करणे,नवीन अभ्यासक्रम आणि विषय तसेच अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध प्रस्तावांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.





महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा - केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर (GST) अधिनियम २०१७ मधील तरतुदींशी सुसंगती राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील GST व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून करप्रणालीतील सुसूत्रता वाढेल.



MIDCच्या कर्जउभारणी अधिकारात वाढ - औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्जउभारणी अधिकारात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी उभारणे अधिक सुलभ होणार असून राज्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि विकासाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयांचा प्रशासन, शिक्षण,करव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे. विशेषतः प्रशासकीय पुनर्रचना आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यामुळे सेवा वितरण अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा असून औद्योगिक विकासालाही नवी गती मिळणार आहे.