Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा भारतातील पहिल्या ‘कायदा सोबती’ कार्यशाळेत सहभाग


सोलापूर : भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजामध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून तळागाळात कायदेशीर नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘कायदा सोबती (Law Friend) नेतृत्व विकास प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत’ सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

५ ते ८ जून २०२६ दरम्यान पुण्यातील कोथरूड येथील आय.आय.ई.जे.पी.नाईक सेंटर येथे झालेल्या या चार दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,पुणे,कोरो इंडिया,भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती (महाराष्ट्र राज्य) आणि एस.एम.एस.सी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.



महाराष्ट्रातील अकोला,अमरावती,ठाणे,नांदेड,नागपूर, नाशिक,परभणी,पालघर,बीड,मुंबई उपनगर,यवतमाळ, लातूर,वाशिम,सांगली,सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील कार्यकर्ते या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

सोलापूर जिल्ह्यातून भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचे यशवंत फडतरे,अंधरुढी संस्थेच्या वैशाली बनसोडे, लोक वंचित संस्थेचे अशोक कांबळे  एस एम एस सी फाउंडेशनचे अशोक मरिआईवाले,सोलापूर महिला संस्थेच्या योजना कामतकर यांनी सहभाग नोंदविला.





भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजातील सामान्य नागरिकांना माहिती अधिकार,मानवाधिकार,लोकसेवा हमी कायदा,विधी सेवा प्राधिकरण कायदा आणि इतर महत्त्वाच्या कायद्यांचे ज्ञान मिळावे,तसेच प्रत्येक गाव,तांडा आणि वस्तीमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन करणारे स्थानिक नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने ‘कायदा सोबती’ ही संकल्पना मनीष देशपांडे यांनी मांडली.



कार्यशाळेत माहिती अधिकार क्षेत्रातील अभ्यासक विवेक वेलणकर,मानवाधिकार कायदेतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सरकारी वकील तेजल बडवे यांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा,मानवाधिकार, दप्तर दिरंगाई कायदा,महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा,मोफत कायदेशीर मदत,पुरावे संकलन,तक्रार प्रक्रिया आणि न्यायप्रवेश याविषयी सहभागींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या कार्याचा आढावा मुमताज शेख यांनी सादर केला,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पाराव राठोड यांनी केले. कार्यशाळेचे डॉक्युमेंटेशन आणि व्हिडिओ चित्रीकरण शरद बाराथे यांनी केले.

समारोप प्रसंगी ग्रामीण विकास केंद्राच्या उमा जाधव, एस.एम.एस.सी.फाउंडेशनचे डायरेक्टर ॲड.तृणाल टोणपे आणि प्रोग्राम मॅनेजर निकिता आनंद यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या प्रशिक्षणानंतर सोलापूर जिल्ह्यातील सहभागी आता ‘कायदा सोबती प्रशिक्षक’ म्हणून जिल्हा,तालुका,तांडा आणि वस्ती स्तरावर माहिती अधिकार,मानवाधिकार,लोकसेवा हमी कायदा,दप्तर दिरंगाई कायदा आणि विधी सेवा प्राधिकरण कायद्याबाबत प्रशिक्षण व जनजागृती करणार आहेत. त्यामुळे भटके-विमुक्त,आदिवासी आणि वंचित समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करून न्यायप्रवेश अधिक सुलभ करण्यासाठी मदत होणार आहे.