Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ समित्यांच्या दौऱ्यांना स्थगिती


मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि त्याअनुषंगाने काटकसरीच्या उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात महाराष्ट्र विधानमंडळाच्या विविध समित्यांचे दौरे आयोजित करण्यात येऊ नयेत,असे निर्देश सचिवालयाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या समिती समन्वय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की,पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर खर्चात काटकसर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्या अनुषंगाने ही उपाययोजना करण्यात आली आहे.



या निर्णयामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित होणारे समित्यांचे अभ्यासदौरे आणि बैठका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित राहणार आहेत. मात्र,विधान भवनातील समिती बैठका तसेच विभागीय सचिवांच्या साक्षीसाठी आयोजित बैठका यांना या निर्णयातून अपवाद ठेवण्यात आला आहे. तसेच,हे परिपत्रक जारी होण्यापूर्वी ज्या समिती दौऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती,ते दौरेदेखील रद्द करण्याचे निर्देश संबंधित समिती कक्षांना देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत शासनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.