सोलापूर : (सैफन शेख) पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की,एखादी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांकडून फोनचा अक्षरशः पाऊस पडतो. बातमीतील एखादा शब्द,छायाचित्र,माहिती किंवा तपशील याबाबत चर्चा करण्यासाठी अनेक जण संपर्क साधतात. मात्र,त्याच वृत्तसंस्थेच्या किंवा माध्यमाच्या जाहिरातीबाबत विचारणा करण्यासाठी मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे "बातमीसाठी दहा फोन,जाहिरातीसाठी एकही फोन नाही; व्हारे..!" अशी भावना अनेक पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये व्यक्त होताना दिसते.
आजच्या डिजिटल युगात बातम्या वाचण्याची,पाहण्याची आणि शेअर करण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणतीही बातमी प्रसिद्ध झाली की संबंधित व्यक्ती,राजकीय नेते,कार्यकर्ते,अधिकारी किंवा नागरिक त्वरित प्रतिक्रिया देतात. अनेकदा बातमीतील माहितीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा आभार मानण्यासाठीही फोन येतात. परंतु माध्यम संस्थेच्या आर्थिक पाठबळासाठी आवश्यक असलेल्या जाहिराती देण्याच्या बाबतीत मात्र उदासीनता दिसून येते.
माध्यम संस्था चालवण्यासाठी वृत्तसंकलन,छपाई,तांत्रिक सुविधा,इंटरनेट,कार्यालयीन खर्च,कर्मचारी वेतन आणि प्रवास अशा विविध खर्चांचा सामना करावा लागतो. या सर्व खर्चाचा मुख्य आधार जाहिराती असतात. मात्र अनेक व्यापारी,संस्था आणि लोकप्रतिनिधी माध्यमांकडून सातत्याने प्रसिद्धीची अपेक्षा ठेवतात,पण जाहिरातींद्वारे सहकार्य करण्यास पुढे येत नाहीत.
पत्रकारितेचे महत्त्व लोकशाहीत अनन्यसाधारण आहे. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे,जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि विविध घडामोडींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे माध्यमांचे प्रमुख कार्य आहे. त्यामुळे बातम्यांसोबतच माध्यमांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जाहिरातींचे महत्त्वही तितकेच मोठे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
म्हणूनच "बातमीसाठी दहा फोन,जाहिरातीसाठी एकही फोन नाही; व्हारे..!" ही केवळ विनोदी टिप्पणी नसून,सध्याच्या माध्यम क्षेत्रासमोरील वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारी भावना असल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगत आहे.
