सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस अंमलदार हेमंत वायमारे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
सोलापूर : दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात खडतर आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रासह सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे (नेमणूक गुन्हे शाखा) आणि पोलीस अंमलदार हेमंत वायमारे (नेमणूक पोलीस आयुक्त यांचे अंगरक्षक) यांनी या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत आयोजित होणारी ही स्पर्धा यंदा 85.777 किलोमीटर अंतराची होती. पहाटे 5 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेचा मार्ग डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग असा होता. जगभरातील सुमारे 21,678 धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कठीण चढ-उतार, प्रतिकूल हवामान आणि मानवी सहनशक्तीची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणे हेच मोठे आव्हान मानले जाते.
स्पर्धेत दत्तात्रय काळे यांनी 10 तास 23 मिनिटांत शर्यत पूर्ण केली, तर हेमंत वायमारे यांनी 9 तास 19 मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत महाराष्ट्र पोलीस दलामधून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून ती ‘अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमध्ये अनेक कठीण टप्पे आणि चेक पॉइंट्स असतात. निर्धारित वेळेत प्रत्येक टप्पा पार करण्यात अपयश आल्यास स्पर्धक बाद होतो. त्यामुळे ही स्पर्धा मानवी जिद्द, चिकाटी आणि मानसिक बळाची खरी परीक्षा मानली जाते.
खराब हवामान, प्रखर थंडी,उष्णता तसेच शारीरिक आणि मानसिक थकवा यांवर मात करत दोन्ही पोलिसांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. अंतिम 400 मीटरमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. भारतीय तिरंगा फडकावत फिनिश लाईन पार करताना त्यांनी देशाचा अभिमान जागतिक स्तरावर उंचावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दत्तात्रय काळे आणि हेमंत वायमारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे सोलापूर पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, क्रीडा क्षेत्रातही पोलीस दलाचे योगदान अधोरेखित झाले आहे.
