मुळेगाव तांड्यावर हातभट्टी दारू अड्ड्यावर संयुक्त धाड; ८.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ गुन्हे दाखल
ऑपरेशन समन्वय अंतर्गत उत्पादन शुल्क, पोलीस, वन व महसूल विभागाची कारवाई; ४,२५० लिटर रसायन नष्ट
सोलापूर : ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नेतृत्वाखाली संयुक्त धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४,२५० लिटर रसायनासह एकूण ८ लाख २८ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार उत्पादन शुल्क, पोलीस, वन, महसूल व महावितरण विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. कारवाईदरम्यान हातभट्टी निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य, उपकरणे तसेच मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले लाकूड जप्त करण्यात आले.
वन विभागाने अनधिकृत सॉ मिलवरही कारवाई करून आरा यंत्र, ग्राइंडर, वीज मीटर, चेन सॉ, वजन काटा आणि सुमारे १६० घनमीटर लाकूड असा सुमारे ६.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महावितरण विभागाने अनधिकृत वीज वापर प्रकरणी ४०० मीटर वीजतार जप्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते १९ जून २०२६ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ७०८ गुन्हे नोंदवून ५६ वाहनांसह २ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी अशा संयुक्त कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
