सोलापूर : सोलापूर येथील ॲड.आशुतोष शिंदे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा,वकिली व्यवसायाच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर तसेच सोलापूर बार असोसिएशनकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
दिनांक 23 जून 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,तसेच वकिलांच्या व्यावसायिक अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनानंतर आठ दिवसांच्या आत योग्य चौकशी व आवश्यक कार्यवाही झाली नाही, तर सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने पुढील भूमिका निश्चित करून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान,सोलापूर बार असोसिएशनने न्यायव्यवस्थेचा सन्मान,वकिलांचे अधिकार आणि कायद्याचे राज्य याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
