Ticker

6/recent/ticker-posts

११ लाखांच्या बनावट सोन्याच्या बुद्धमूर्ती प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामीन; कोल्हापूर खंडपीठाचा आदेश


सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ११ लाख रुपये रोख रक्कम लुटल्याचा आणि बनावट सोन्याची बुद्धमूर्ती दाखवून फसवणूक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात,आरोपी अनिल रामचंद्र राठोड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी २४ जून २०२६ रोजी हा आदेश दिला.

फिर्यादी संजयकुमार अंबादास राठोड (रा.उदयनगर,जवरगी रोड,कलबुर्गी,कर्नाटक) यांना दोड्डी येथील श्रीकांत राठोड हा दोन किलो सोने कमी दरात विकणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २ जुलै २०२५ रोजी त्यांनी संजू पवार यांच्यासह दोड्डी तांडा येथे जाऊन सोन्याचा नमुना पाहिला. हा नमुना महादेव सोनार यांनी तपासून खरा असल्याचे सांगितल्याने व्यवहार पुढे नेण्यात आला.





त्यानंतर ६ जुलै २०२५ रोजी फिर्यादीसह युसुफ पटेल,संजू पवार,आकाश राठोड आणि महादेव सोनार हे सर्वजण ११ लाख रुपये रोख रक्कम घेऊन ब्रेझा कारमधून दोड्डीकडे रवाना झाले. कुंभारी येथे पोहोचल्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून अनिल राठोड त्यांना घेऊन गेला. बाळू राठोड यांच्या शेताजवळ श्रीकांत राठोडने सोन्याची बुद्धमूर्ती दाखवून पैशांची मागणी केली. यावेळी वाहनात असलेली ११ लाखांची रोख रक्कम पाहून आरोपींनी चाकूचा धाक दाखवत ती रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

घटनेनंतर फिर्यादी कलबुर्गीला परतले. तेथे महादेव सोनार यांनी बुद्धमूर्तीची तपासणी केली असता ती सोन्याची नसून बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी २५ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ४४८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बाळू रामा राठोड, श्रीकांत लिंबाजी राठोड,अनिल रामचंद्र राठोड,करण राठोड आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.





दरम्यान,आरोपी अनिल रामचंद्र राठोड यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोपीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब, एफआयआरमधील कथनावरील संशय तसेच मजूर पुरवठ्याच्या व्यावसायिक वादातून सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदिर औटी, ॲड.सौरभ तांदळे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनीष बाबरे,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ आणि ॲड.संकेत पवार यांनी काम पाहिले.