Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या आरोग्य विभागाचा ऐतिहासिक गौरव!


NQAS मानांकनात तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांची दमदार कामगिरी; CEO कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) देशभरातील आरोग्य संस्थांच्या गुणवत्ता, सुविधा आणि रुग्णकेंद्रित सेवांचे मूल्यांकन करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) प्रदान केले जाते. या राष्ट्रीय स्तरावरील मानांकनात सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी यश संपादन करून जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

NQAS मानांकनाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे.

तीन आरोग्य मंदिरांची उत्कृष्ट कामगिरी
राष्ट्रीय NQAS मूल्यांकनात सोलापूर जिल्ह्यातील तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी उत्कृष्ट गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे.

१) आयुष्मान आरोग्य मंदिर, मुस्ती
संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र – बोरामणी, दक्षिण सोलापूर
गुणांकन – ८४.३१ टक्के
२) आयुष्मान आरोग्य मंदिर, येवती
संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र – पाटकुल, मोहोळ
गुणांकन – ८३.७३ टक्के
३) आयुष्मान आरोग्य मंदिर, औंधी
संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र – अंकोली, मोहोळ
गुणांकन – ८२.०० टक्के

गुणवत्ता, सुरक्षितता आणि रुग्णकेंद्रित सेवेला प्राधान्य
NQAS हे आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे मानांकन आहे. यामध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध व्यवस्थापन, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, नोंदवही व्यवस्थापन, सेवा वितरण, व्यवस्थापन व्यवस्था आणि रुग्णांचे समाधान अशा विविध बाबींचे मूल्यांकन केले जाते.

या मानांकनामुळे संबंधित आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील आरोग्यसेवा अधिक गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मोठा फायदा मिळणार आहे.

प्रोत्साहन निधीमुळे आरोग्य सुविधांना बळकटी
NQAS मानांकन मिळालेल्या आरोग्य संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गुणवत्ता प्रोत्साहन निधी (Incentive Fund) मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या माध्यमातून आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, रुग्ण सुविधा आणि सेवा व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यश
हे ऐतिहासिक यश सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नियंत्रण व नेतृत्वाखाली साध्य झाले आहे.

यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्यासह आरोग्य विभागाच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.
तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवता आले.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवीर, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अमृता वाघ यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन केले.

अधिकाधिक आरोग्य संस्थांनी NQAS मिळवावे
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी हे यश निश्चितच महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोलापूरच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेने राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाच्या माध्यमातून घेतलेली ही भरारी म्हणजे अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक आणि आशा स्वयंसेविकांच्या सामूहिक मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील पावतीच म्हणावी लागेल.