सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पेन्नूर येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून कट रचून खून केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५९७/२०२६ अंतर्गत दत्तात्रय अण्णा पवार (वय २६), प्रशांत बाळू शिंदे (वय २०), अण्णा हरिदास पवार (वय ५६) आणि अंबिका उर्फ अंबू अण्णा पवार (वय ४२, सर्व राहणार पेन्नूर, तालुका मोहोळ,जिल्हा सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार,मयत युवराज अशोक व्यवहारे याचे आरोपींच्या घरातील महिलांशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. गावातील मध्यस्थीनंतर हा वाद मिटविण्यात आला होता. मात्र, १३ जून २०२६ रोजी झालेल्या नव्या वादानंतर आरोपींनी मयतास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर १६ जून २०२६ रोजी मध्यरात्री मयत युवराज व्यवहारे घराबाहेर झोपलेला असताना आरोपी दत्तात्रय पवार व प्रशांत शिंदे यांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच,अण्णा हरिदास पवार आणि अंबिका उर्फ अंबू पवार यांनी हा खून घडवून आणण्यासाठी कट रचल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणात अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू पवार यांना १६ जून २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद - आरोपींच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की,आरोपींना खोटेपणाने गुन्ह्यात अडकविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तपास जवळपास पूर्ण झाला असून पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याने जामीन मंजूर करण्यात यावा,अशी विनंती करण्यात आली.
सरकार पक्षाचा विरोध;न्यायालयाचा निर्णय - सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. मात्र,दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस.शर्मा यांनी १३ जुलै २०२६ रोजी अण्णा हरिदास पवार व अंबिका उर्फ अंबू पवार यांना सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी, ॲड.वैभव बोंगे, ॲड.ओंकार फडतरे, ॲड.शिवरत्न वाघ, ॲड.मोहीम पठाण, ॲड.मनिष बाबरे, ॲड.रोहित थोरात, ॲड.अजय वाघमारे, ॲड.त्वरिता वाघ, ॲड.संकेत पवार, ॲड.प्रदीप गायकवाड आणि ॲड.सागर स्वामी यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड.कुर्डूकर यांनी बाजू मांडली.
