Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचे मूक आंदोलन; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सकारात्मक संवादाची मागणी


अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी अहिल्यानगर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दोन तासांचे मूक आंदोलन केले. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या आंदोलनातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन सकारात्मक संवाद साधावा,अशी मागणी केली.

आंदोलनाच्या एक दिवस आधी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि हिंसाचाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता,त्यांच्या भावना,वेदना आणि अपेक्षा समजून घेऊन सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा,असे त्यांनी पत्रात नमूद केले. हजारे यांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. आंदोलनानंतर ते आपल्या राळेगण सिद्धी या गावी रवाना झाले.





यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही पाठिंबा दर्शविला. संबंधित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असून, अशा निर्णयामुळे सरकार कमकुवत होणार नाही, उलट जबाबदार शासनाचा संदेश देशभर जाईल,असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी केलेल्या या मूक आंदोलनामुळे केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.