सोलापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मार्च महिन्यात उघडकीस आणलेल्या लाच प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची प्रगती झाली असून, मोहोळ तालुक्यातील मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात मंडळ अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, माढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा क्रमांक ८१/२०२६ हा २९ मार्च २०२६ रोजी नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात तलाठी सुदर्शन जाधव यांनी तक्रारदाराकडे शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पडताळणी व यशस्वी सापळा कारवाईनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सापळा कारवाईपूर्वी २७ मार्च २०२६ रोजी वाफळे (ता. मोहोळ) येथील चौकात तक्रारदार व त्यांच्या सोबतच्या साक्षीदारांकडून प्रत्येकी ३३ हजार रुपये, असे एकूण ९९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ८० हजार रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे इतर साक्षीदाराच्या खात्यावर वर्ग करण्यास सांगण्यात आले, तर १९ हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान तक्रारदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर पुराव्यांच्या आधारे तलाठी सुदर्शन जाधव यांच्यासोबत मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांचाही लाच स्वीकारण्याच्या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना आरोपी करण्यात आले असून २३ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली.
दरम्यान, एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
