नवी दिल्ली : दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस मारहाणीच्या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकेचा तातडीने उल्लेख करण्यात आला होता. मात्र,न्यायालयाने तत्काळ सुनावणीस नकार देत, "आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका," असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आंदोलकांवर पोलिसांकडून अत्याधिक बळाचा वापर झाल्याचा आरोप करत त्यासंबंधीचे व्हिडिओ पुरावे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, "आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही," अशी प्रतिक्रिया दिली आणि तातडीच्या सुनावणीस नकार दिला.
ही याचिका दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आली होती. आंदोलकांवर लाठीमार व बळाचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला असून,या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करावा,अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र,न्यायालयाने या टप्प्यावर तातडीची सुनावणी आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले.
