Ticker

6/recent/ticker-posts

"स्पर्धा परीक्षा आंदोलनावर दडपशाहीचा आरोप; प्रकाश रेड्डी यांची सरकारवर तीव्र टीका,जनआंदोलनाची हाक"


"पोलीस कारवाई,विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि कथित दबावाच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी,अशी मागणी"

मुंबई : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र टीका केली आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून आणि सुरक्षा यंत्रणांकडून कठोर कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की,ओळखपत्र नसलेल्या पॅरामिलिटरी दलासारख्या व्यक्ती युवकांच्या वेशात विशिष्ट प्रकारच्या लाठ्या घेऊन आंदोलनस्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना गंभीर दुखापत करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकाराला त्यांनी "सरकारी गुंडगिरी" आणि "फॅसिझम" असे संबोधले आहे.




तसेच,आंदोलनाशी संबंधित कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या घरी रात्री-अपरात्री पोलिस आणि विशेष शाखेचे अधिकारी भेट देत असल्याचा,फोन करून चौकशी केली जात असल्याचा,काहींना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये फिरवले जात असल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांवर दबाव आणला जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) दखल घ्यावी,अशी मागणीही प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. "आज तुम्ही बोलला नाहीत तर उद्या तुमच्याही दारावर हीच वेळ येऊ शकते. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचा प्रश्न हा प्रत्येक कुटुंबाशी संबंधित आहे," असे आवाहन त्यांनी केले आहे.


विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पेपरफुटी तसेच कथित दडपशाहीविरोधात व्यापक जनआंदोलन हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

टीप : वरील वृत्तातील आरोप हे प्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलेले दावे आहेत. या आरोपांवर संबंधित शासन, पोलीस प्रशासन किंवा अन्य अधिकृत यंत्रणांची भूमिका या वृत्ताच्या प्रकाशनापर्यंत उपलब्ध झालेली नाही.